अपघातग्रस्त कामगारांच्या शस्त्रक्रियेसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील अनेक कारखान्यात अपघात झाला आणि त्यात कामगार जखमी झाला तर कंपन्यांचे मालक हात वर करतात किंवा जुजबी पैसे देऊन मोकळे होतात पण आता तसे होणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी तसे आदेश दिले आहेत जखमी कामगारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर ती हॉस्पिटलने तात्काळ केली पाहिजे आणि त्याचा सर्व खर्च हा कंपनी मालकाने करण्याची गरज असल्याचे निर्देश फुंडकर यांनी दिले आहेत असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

    राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन शरीराचा एखादा अवयव गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे अपघातग्रस्त अवयव पुन्हा प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी दिले. प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना फुंडकर यांनी दिल्या.

    नरिमन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत फुंडकर बोलत होते. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उपसचिव दीपक पोकळे उपस्थित होते.

    अपघात झाल्यास पहिल्या काही तासांचा अवधी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची अद्ययावत माहिती सर्व कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये असणे अनिवार्य करण्यात यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना तातडीने मदत मिळेल.कामगारांना अपघाताच्या वेळी त्वरित संपर्क साधता यावा आणि पुढील वैद्यकीय मार्गदर्शनासाठी दिशा मिळावी, यासाठी ‘हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात यावा, अशा सूचना ॲड फुंडकर यांनी दिल्या.