ड्युरोक्रेट इंजिनियरिंग सर्व्हिसेसमध्ये तिसरा वेतन करार संपन्न; २८ कामगारांना ₹८,२५० ग्रॉस वेतनवाढीचा लाभ
नऱ्हे (पुणे) : औद्योगिक क्षेत्रात सौहार्दपूर्ण वातावरणाचे एक उत्तम उदाहरण घालून देत, ड्युरोक्रेट इंजिनियरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमि.(Durocrete Engineering Services Pvt. Ltd) , नऱ्हे येथील बांधकाम साहित्य मटेरियल टेस्टिंग लॅब व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्यामध्ये शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी तिसरा वेतन करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कायम कामगारांना थेट लाभ होणार असून, औद्योगिक वर्तुळात या करारांची विशेष दखल घेतली जात आहे.
कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
सदर वेतन करार १ जुलै २०२५ ते ३० जून २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. करारान्वये कामगारांना ₹८,२५० ग्रॉस इतकी वेतनवाढ मंजूर करण्यात आली असून, करार लागू झाल्याच्या दिनांकापासून सर्व थकीत आर्थिक फरक (Arrears) अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही व्यवस्थापनाने घेतला आहे. याशिवाय, कामगारांच्या इतर सर्व सुविधा पूर्ववत कायम ठेवण्यात आल्या आहेत.
या करारातील एक विशेष आणि मानवीय तरतूद म्हणजे "मृत्यू अनुदान निधी" योजना. या योजनेअंतर्गत कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा अथवा कायमस्वरूपी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, सर्व कर्मचारी व कायम कामगारांच्या एक दिवसाच्या ग्रॉस वेतनाइतकी रक्कम गोळा करून, त्याच्या समतुल्य रक्कम कंपनीकडूनही जोडण्यात येणार आहे. ही एकत्रित रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारसांना प्रदान केली जाणार आहे. ही तरतूद कामगारांप्रती व्यवस्थापनाची संवेदनशीलता अधोरेखित करते.
डॉ. रघुनाथ कुचिक यांची मार्गदर्शक भूमिका
या संपूर्ण करार प्रक्रियेत भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तथा शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली हा करार सुरळीत व यशस्वीपणे पूर्ण होऊ शकला, असे कामगार प्रतिनिधींनी सांगितले.
स्वाक्षरी सोहळा उत्साहात संपन्न
करारावर स्वाक्षऱ्यांचा सोहळा नऱ्हे येथील कंपनीच्या आवारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री. मोहम्मद मासरी (मुख्य परिचालन अधिकारी – COO) आणि कु. त्रिवेणी महाजन (एचआर ऑपरेशन्स) यांनी सहभाग घेतला.
भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, चिटणीस श्री. शुभम दिघे, राज्य कार्यकारणी सदस्य श्री. दीपक शेडे तसेच स्थानिक युनिटचे पदाधिकारी — अध्यक्ष श्री. सुधीर कदम, सरचिटणीस श्री. विनोद महेंद्रकर, उपाध्यक्ष श्री. अजय क्षीरसागर, चिटणीस श्री. महेश गुरव आणि श्री नरेश पवार खजिनदार हे उपस्थित होते.
कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
या ऐतिहासिक कराराने कंपनीतील सर्व कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील परस्पर विश्वास आणि सहकार्याचे हे करार एक उत्तम प्रतीक असल्याचे मत कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केले. हा करार म्हणजे केवळ वेतनवाढ नव्हे, तर कामगारांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा करार असल्याचे डॉ. कुचिक यांनी यावेळी नमूद केले.
