कंपनीची जमीन विकून थकबाकी द्यावी, कामगार संघर्ष समितीची मागणी

ठाणे : कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी १९८९ मध्ये अचानक बंद झाल्याने हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. तब्बल ३७ वर्षे उलटूनही या कामगारांना त्यांच्या थकबाकी, पीएफ आणि निवृत्तीवेतनाचा न्याय मिळालेला नसल्याने मफतलाल कामगार संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीची १२३ एकर जमीन विकून सर्व थकबाकी द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

    कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड ही कंपनी २७ मे १९८९ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे सुमारे २२०० हून अधिक कामगार बेरोजगार झाले. त्याआधी १९८६ पासूनच अन्यायाची प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. त्या काळात अनेक कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आले, तर दीर्घकाळ सेवा बजावलेल्या कामगारांवर अन्याय झाल्याचे समितीचे म्हणणे आहे.

    कामगारांच्या वतीने न्यायालयीन लढाई लढण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले. १९९९ मध्ये कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरकडे सोपविण्यात आली. त्यानंतर जागेच्या विक्रीसाठी अनेक वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र कोणताही विकासक पुढे आला नाही.सध्या ही १२३ एकर जागा सुमारे ११३२ कोटी रुपयांची असल्याचे मूल्यांकन समोर आले आहे. तरीही विक्री प्रक्रिया रखडल्याने कामगारांची देणी प्रलंबित आहेत.

    दरम्यान, २०२४ मध्ये डीआरटीमार्फत लिलाव जाहीर करण्यात आला, पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. कामगार संघर्ष समितीचे म्हणणे आहे की, झोपडपट्ट्या, पार्किंग आणि इतर मालमत्तांमधून आर्थिक व्यवहार सुरू असताना कामगार मात्र न्यायापासून वंचित आहेत. अनेक कामगारांचे निधन झाले असून उर्वरित कामगार आजही थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. जमीन विकून कामगारांचे सर्व देणे अदा करावे, अशी ठाम मागणी समितीने केली असून आचारसंहिता संपल्यानंतर या विषयावर अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.