पिंपरी : अन्यायकारक बदल्या आणि कामगारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी व्यवस्थापना विरोधात कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आहे. मात्र, कामगारांनी केलेले आरोप कंपनी व्यवस्थापनाकडून फेटाळण्यात आले. कामगारांना चर्चेची द्वारे खुली असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.
कंपनी व्यवस्थापनाने म्हटले की, व्यवसाय पुनर्रचनेच्या अंतर्गत कंपनीच्या मोटारसायकल बॅटरी उत्पादनाचे संचालन अहिल्यानगर, बावल, हरियाणामध्ये स्थलांतरित केले गेले. चिंचवड येथील दहा कामगारांची बदली तिकडे करण्यात आली. परंतु, या कर्मचाऱ्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. अनेक चर्चा व पर्याय देऊन संबंधित कर्मचारी रुजू झाले नाहीत. कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेला चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी १८ डिसेंबरपासून चिंचवड येथील कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरु केले. अहिल्यानगरमध्ये पुनःरोजगार आणि नुकसान भरपाईचेही पर्याय उपलब्ध करून दिले, तरीही कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने २१ ऑगस्टला कायदेशीररीत्या त्यांच्या रोजगाराची समाप्ती केली.
कंपनीकडून 'व्हीआरएस'ची सक्ती किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप खोटा असून, तो प्रतिमा खराब करण्यासाठी केला आहे. कर्मचाऱ्यांनी अनुचित आणि बेकायदेशीर मागण्या मांडून संप सुरू केला आहे. याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी तसेच कामगार संघटनेने पुन्हा एकदा चर्चेसाठी यावे, असे आवाहन मनुष्यबळ विभागाचे प्रमुख संतोष चव्हाण यांनी केले