पिंपरी चिंचवड : नव्याने येऊ घातलेल्या कामगार कायद्यांमुळे उद्योग, नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यावर कोणते परिणाम होणार याची सखोल माहिती व्हावी, यासाठी NIPM पुणे तसेच पिंपरी चिंचवड-चाकण चॅप्टर यांच्यातर्फे “डीकोडींग ऑफ लेबर कोड ” या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यांच्या सहकार्याने हे सत्र ASM CSIT कॉलेज, पिंपरी चिंचवड येथे रविवार दिनांक 24 ऑगस्ट 25 रोजी संपन्न झाले .
या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ ॲड. अशोक गुप्ते यांनी अभ्यासपूर्ण व सखोल मार्गदर्शन करताना नव्या लेबर कोड्सचा जुन्या कायद्यांशी तुलनात्मक आढावा घेतला. या चर्चासत्रा दरम्यान प्रचलित असणारे 29 कामगार कायदे यांचे नव्याने येऊ घातलेले चार कोड मध्ये विलीनीकरण कशा पद्धतीने होईल तसेच कोड ऑन वेजेस, इंडस्ट्रियल रिलेशन कोड, सोशल सेक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स चारही येऊ घातलेल्या कोड बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करताना नव्याने येऊ घातलेले बदल व त्याचा कामगार वर्ग, कॉन्ट्रॅक्ट लेबर्स, गिग वर्कर्स, कामगार संघटना, संघटित व असंघटित कामगार आणि यांच्याशी संलग्न कायदे तसेच उद्योगाशी निगडित सद्यस्थितीतील कायदे यामधील बदल व त्या दृष्टीने मनुष्यबळ विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी व पूर्वतयारी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रा दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील शंका याबाबत गुप्ते साहेब यांच्याकडून निरसन केले व त्यांच्या मनातील शंकांबाबत मार्गदर्शन घेऊन त्याचा येणाऱ्या काळात वापर करण्याच्या दृष्टीने व पूर्वतयारी करण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. या चर्चासत्राला 150 हून अधिक एच आर व इंडस्ट्रियल रिलेशन्स विभागात विविध नामांकित कंपनीत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, उद्योगक्षेत्रातील मान्यवर व शैक्षणिक तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शनपर चर्चासत्रामुळे केवळ कायद्यांचा तांत्रिक उलगडा झाला नाही तर प्रत्यक्ष कामकाजातील अडचणी, संधी आणि भविष्यातील तयारीबाबत सहभागींच्या मनात अनेक कल्पना निर्माण झाल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NIPM पुणे चॅप्टर चे अध्यक्ष कल्याण पवार, डॉ. संजय झोपे, संजय राणे व NIPM पिंपरी चिंचवड-चाकण चॅप्टर चे अध्यक्ष प्रदीप मानेकर, सचिव नवनाथ सुर्यवंशी, अॅडिशनल सचिव राहुल निंबाळकर, उपाध्यक्ष अर्जुन माने, अमित देशपांडे, संपत परधी, महेंद्र फणसे, दिग्विजय पिसाळ व प्रणव बेहेरे आदींचे मोलाचे योगदान राहिले. या कार्यक्रमास निवृत्त कामगार उपआयुक्त श्री. काकडे साहेब, एन आय पी एम वेस्टर्न रिजन कार्यकारणी सदस्य अमोल कागवडे, भारत फोर्ज बारामती कंपनीचे सदाशिव पाटील, दादा थोरात, मधुकर सुर्यवंशी, सतीश कुलकर्णी, महेंद्र जगदाळे, दत्तात्रय नकाते, जेसीबी कंपनीचे संतोष राऊत व विश्वजीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींची विशेष उपस्थिती राहिली.
सहभागी मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारच्या ज्ञानवर्धक सत्रांची गरज अधोरेखित केली व यास दुजारा म्हणून एन आय पी एम च्या दोन्ही चाप्टरच्या पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्या लेबर कोड्सकडे उद्योगक्षेत्र व कामगार संघटनांचे वेधक लक्ष लागलेले असताना या सत्राने व्यवहार्य दृष्टीकोन दिल्याने मनुष्यबळ विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरला.