टाटा मोटर्स (Tata Motors) येथे वेतनवाढ करार संपन्न

पिंपरी : टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील कार प्लांट आणि ट्रक प्लांटमधील कर्मचाऱ्यांसाठीचा वेतन सुधारणा करार पूर्ण झाला आहे. या करारानुसार एक सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२९ या चार वर्षांत एकूण २० हजार ५०० रुपयांची वेतनवाढ होणार आहे असे वृत्त दैनिक लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

     मुदतपूर्व करार झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला २५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे, समाधानाचे वातावरण आहे.

     टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष शिशुपाल तोमर यांनी ही माहिती दिली. या कराराचा पाच हजार कामगारांना फायदा होणार आहे. पगारवाढीची रक्कम चार हप्त्यांमध्ये मिळणार आहे. पहिल्या वर्षी ६५ टक्के, दुसऱ्या वर्षी १५ टक्के, तर तिसऱ्या व चौथ्या वर्षी प्रत्येकी १० टक्के वाढ लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या थेट पगारात १७ हजार ८६९ रुपये आणि अप्रत्यक्ष लाभांमध्ये दोन हजार ६३२ रुपयांची भर पडणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात दहा हजार ८०० रुपयांची वाढ तर एफडीएमध्ये दोन हजार ३७२ रुपयांची वाढ होणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी, उपस्थिती पुरस्कार, पीएल एनकॅशमेंट, ड्रेस व हाऊस अलाउन्स यांसारख्या विविध बाबींमध्येही वाढ करण्यात आली आहे.

      या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी दिवंगत रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष विशाल बादशाह, प्रमोद चौधरी, विभागाचे प्रमुख अनुराग छारिया, नीरज आगरवाल, मनुष्यबळ विकास विभाग प्रमूख आदिती गुप्ता, विवेक बिंद्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. युनियनच्या वतीने अध्यक्ष शिशुपाल तोमर, सरचिटणीस अजित पायगुडे, कार्याध्यक्ष सतीश काकडे, खजिनदार औंदुंबर गणेशकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. वाटाघाटी समितीमधील युनियनचे सदस्य योगेश तळेकर, सचिन लांडगे, आबिद अली सय्यद, संजीव आसवले, अनंत खेडेकर, सुजितकुमार साळुंके यावेळी उपस्थित होते.

पूर्वीचा वेतन करार संपण्यापूर्वी नवीन करार पूर्ण करण्याचे कठीण काम कामगारांच्या पाठिंब्यामुळे आणि व्यवस्थापनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शक्य झाले. कामगारांच्या मूळ पगारामध्ये अधिकची वाढ करता आली. हा करार केवळ वेतनवाढीचा नाही, तर कामगारांचा सन्मान, त्यांच्या निष्ठेचा गौरव आणि टाटा परंपरेची देणगी आहे. हा करार संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल.- शिशुपाल तोमर,अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन