कामगार कबड्डी स्पर्धा २ फेब्रुवारीपासून

मुंबई : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी २७ वी आणि महिलांसाठी २२ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होईल. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला अशा तीन गटात स्पर्धेचे सामने खळवले जातील. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे.  स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली मंडळाच्या www.public.mlwb.in  या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालय तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

    महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांच्या पुरुष संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, तर महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली असेल. तिन्ही गटातील अंतिम विजेत्या संघाना प्रत्येकी रु.५०,०००/-, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी रु.३५,०००/-, अंतिम उपांत्य उपविजेता संघाना प्रत्येकी रु.२०,०००/- बक्षिसे दिली जातील. तसेच विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. 

    मुंबई व ठाणे वगळता बाहेरगावाहून येणाऱ्या संघांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रतिदिन रु.४,०००/- दिले जातील. तसेच महिलांच्या मुंबई व ठाणे येथील संघांना प्रतिदिन रु.१,०००/- प्रवास खर्चासाठी दिले जातील. कामगार पुरुष संघासाठी रु.३००/- आणि महिला संघासाठी रु.२००/- प्रवेश शुल्क असेल. प्रवेशिका व प्रवेश शुल्क हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई तेथे स्विकारल्या जातील. जास्तीतजास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.