EPFO सदस्यांसाठी खुशखबर; UPIने PF पैसे मिळणार

नोकरदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. एप्रिल २०२६ पासून ईपीएफओचे सुमारे ८ कोटी सभासद आपल्या पीएफ खात्यातून थेट UPI (Unified Payments Interface) द्वारे पैसे काढू शकणार आहेत. या सुविधेमुळे क्लेम प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार असून गरजेच्या वेळी पैसे त्वरित बँक खात्यात जमा होतील असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.

काय आहे नवीन प्रणाली?

सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागतो आणि पैसे खात्यात येण्यासाठी किमान ३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, नवीन ‘ईपीएफओ ३.०’ प्रणालीनुसार, सदस्य यूपीआय पिन वापरून सुरक्षितपणे पैसे काढू शकतील. या व्यवस्थेत खात्यावर एक ठराविक किमान शिल्लक (Minimum Balance) राखली जाईल आणि उर्वरित रक्कम थेट ट्रान्सफर करता येईल. ही रक्कम डिजिटल पेमेंट, एटीएम किंवा डेबिट कार्डद्वारे वापरणे शक्य होईल.

निकासी मर्यादेत मोठी वाढ

ईपीएफओने ऑटो-सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून वाढवून ५ लाख रुपये केली आहे. गंभीर आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यांसारख्या तातडीच्या कारणांसाठी आता केवळ ३ दिवसांत पैसे उपलब्ध होतील. ऑक्टोबर २०२५ मध्ये केंद्रीय बोर्डाने जाचक अटी कमी करून त्यांचे तीन सोप्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे:

१. तात्काळ गरजा: आजारपण, शिक्षण, विवाह.

२. गृहनिर्माण: घर खरेदी किंवा बांधकाम.

३. विशेष परिस्थिती.

प्रमुख नियम आणि अटी

१००% निकासी: १२ महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सदस्य पात्र रकमेपैकी १००% रक्कम काढू शकतील.

किमान शिल्लक: पीएफ खात्यावर २५% रक्कम शिल्लक ठेवणे अनिवार्य असेल, जेणेकरून सदस्यांना ८.२५% व्याजाचा लाभ मिळत राहील.

कागदपत्रांची कटकट संपली: ‘झिरो डॉक्युमेंटेशन’ आणि १००% ऑटो-अप्रूवलमुळे सदस्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.

सदस्यांना होणारे फायदे –

कोविड काळात सुरू झालेली ऑटो-सेटलमेंट सुविधा आता बँकिंग व्यवहाराइतकी सोपी केली जात आहे. बेरोजगारी किंवा आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा कामगारांसाठी ‘संजीवनी’ ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक तपशील (KYC) अपडेट ठेवणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांसह देशातील ८ कोटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवन अधिक सुखकर होणार आहे.