ठाणे : इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल २८ वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली असे वृत्त तरुण भारत मुंबई वृत्तसंस्थेने दिले आहे
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झाला असून अनेक नागरिकांनी तक्रारींची निवदने सादर केली. उपक्रमात इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली.
आमदार संजय केळकर म्हणाले कि, गेली २८ वर्षे कामगारांना त्यांची देणी मिळाली नाहीत. कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. न्यायालयात दावा हरले असले तरी या कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावीत यासाठी कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्याने ठामपा आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
