वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी लवकरच कंपनीच्या मालकांशी बैठक आयोजित करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारांनी रखडलेला वेतनवाढीचा करार त्वरित करावा, कामगारांचे अपग्रेडेशन करावे, कंपनीतील व्यवस्थापन व कामगार संबध सुधारणा व कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करावे. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कंत्राटी कामगारांचा होत असलेला बेकायदेशीर वापर थांबवावा.
कामगारांना गणवेश देण्यात यावा तसेच कामगारांची थकीत देणी मिळावी यासाठी २२ नोव्हेंबर पासुन संपाला सुरवात केली आहे. आज संपाचा ३३ वा दिवस होता. आज सोमवार (ता. २५) रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी संपावरती तोडगा काढण्यासंदर्भात कामगारांशी चर्चा केली. यावेळी कामगारांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, कामगारांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढू.
आपण एका कुंटूबातील सदस्य आहेत. आपल्या घराच प्रश्न असल्यामुळे आपण प्रेमाने व आदराने मिटवू. लवकरच कामगार युनियनचे प्रतिनिधी व मालक यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करुन कामगारांचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष एड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, डॉ. संजीव लोंढे आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड, सेक्रेटरी शहाजी दबडे उपस्थित होते.
यावेळी कामगारांनी तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाशी बैठक आयोजित करु नये, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कंपनीच्या मालकांशी बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही कामगारांना दिली.