कोल्हापूर : दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षा एवं एज्यु. बोर्ड (भारत सरकार) पुणे विभागांतर्गत कोल्हापूर येथील उप कार्यालय पूर्ववत सुरू करावे, अशा आषयाचे लेखी निवेदन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्यावतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देणेत आले. यावेळी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सदर विषयास अनुसरून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच या कार्यालयास जागा देणेबाबत संबंधित अधिकारी यांना सूचित केले.
नुकतीच दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षा एवं एज्यु. बोर्ड सल्लागार समितीची बैठक विभागीय चेअरमन डॉ. रविकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयामध्ये पार पडली.
या बोर्डाच्या माध्यमातून संघटित व असंघटित कामगार, शेतमजूर महिला, अल्पभूधारक, साखर कामगार, मैल कुली, बांधकाम कामगार, वन मजूर अशा विविध क्षेत्रातील कामगार वर्गासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून संबंधितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते.
यावेळी पुणे विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच जिल्ह्यातील संबंधित कामगारांना या बोर्डाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे लाभ व सोई सुविधा पूर्ववत मिळाव्यात, यासाठी राज्यातील पाचही विभागाची संयुक्त मिटींग आयोजित करून पाठपुरावा करण्याचे ठरले.
त्याचबरोबर स्वतःची इमारत नाही या कारणास्तव, गेली दोन वर्षे कोल्हापूर येथील बंद असलेले उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या कार्यालयासाठी जागेची मागणी करून, हे कार्यालय पुर्ववत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यायोगे कोल्हापूर, सांगली, सातारा आदी. जिल्ह्यातील संबंधित कामगारांना विविध उपक्रमांचा व प्रशिक्षण शिबिरांचा लाभ मिळेल.
सध्या बोर्डाच्यावतीने ठराविक किलोमीटरच्या परीघामधील कामगार वर्गाला लाभ देण्याच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करीत, हि मर्यादा उठवून विभागातील सर्व जिल्ह्यातील संबंधित कामगार वर्गाला लाभ मिळावेत, यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
पुणे येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये चेअरमन डॉ. रविकांत पाटील, विभागीय प्रशासकीय अधिकारी मा. अरुणा वाघ, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, शेतकरी शेतमजूर पंचायतचे प्रकाश शिंदे, साखर कामगार संघटनेचे सर्जेराव हळदकर, भारतीय मजदूर संघाचे अर्जुन चव्हाण, मालपानी ग्रुपच्या HR अधिकारी अर्चना शुक्ला, एम. ई. एस. कामगार संघटनेचे सोमलींग येळवंते आदी. समिती सदस्य उपस्थित होते.
मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना निवेदन देताना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, महादेव चक्के, संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
