कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयात याचिका

विरार : वसई-विरार महापालिकेच्या कार्यरत असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ मधील पदावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु त्या पूर्वीच महापालिकेने नवीन भरती करण्यासाठी कंत्राट दिल्याने अखेर स्थानिक कामगार संघटनेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी आयुक्तांना भेटून दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

     आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर, कामगार नेते राजीव पाटील, आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी कंत्राटावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत घेण्यासाठी आयुक्तांना ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्रव्यवहार केला होता. तदनंतर सरकारने पद भरतीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात जाहीर केली. त्यावेळी तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेला कामगार संघटना आणि आमदारांच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व आयुक्त यांची सतत भेटी घेत होतो, असे हार्दिक राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. सरकारने भरती प्रक्रिया मार्च महिन्यात घेण्यासाठी काही पावले उचलली होती. त्या विरोधात स्थानिक कामगार संघटनेचे कर्मचारी सदस्य यांनी सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेची प्रत आणि निवेदन हार्दिक राऊत यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.