कंपनीला भीषण आग, दोन सेक्शन जळून खाक

पैठण : बिडकीन औद्योगिक वसाहतीतील बडवे इंजिनियरींग कंपनीला गुरूवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत कंपनीचे दोन सेक्शन जळून खाक झाले आहेत. पाच अग्निशमन दलाचे बंब व खासगी पाण्याच्या टँकरद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही असे वृत्त लोकमत वृत्तसमूहाने दिले आहे.

    दरम्यान आगीच्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीत हानीझाली नसल्याचे समजते. बडवे इंजिनियरींग कंपनीच्या नायगाव खंडेवाडी येथील प्लेटींग प्लांट मध्ये रात्री सात वाजेच्या दरम्यान आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनी व्यवस्थापनाने ईमरजन्सी सायरण वाजवून कामगारांना इशारा दिला. यामुळे कंपनीतून कामगार बाहेर पडल्याने जीवीतहानी झाली नाही. आगीत कंपनीचा प्लेटिंग प्लांट व अकाऊंट सेक्शन जळून खाक झाले. घटना समजताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, माळी, राठोड घटनास्थळी दाखल झाले. 

    नायगाव-खंडेवाडी (गेवराई तांडा) येथील बडवे इंजिनिअरिंग प्रा.ली. कंपनीच्या बडवे इंजिनिअरिंग युनिट-02 या प्लेटिंग शॉपला (सायलेन्सर-दुचाकी) शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण शॉप जळाला असून आग इतकी भीषण होती की प्लेटिंग शॉपच्या शेजारीच असलेल्या अकाउंट विभागाला सुद्धा आग लागली. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाचे बंब व सहा खासगी टँकर बोलावण्यात आले. परंतु कंपनीतील गँसचे सिलेंडर फुटल्याने आग भडकली. आग लागली तेव्हा कंपनीत १०० पेक्षा जास्त कामगार होते मात्र सुदैवाने आग भडकण्या अगोदर सर्वांना बाहेर पडण्यात यश आले.