ट्रॅन्टर इंडिया कंपनीच्या कामगारांचे कुटुंबीयासहित उपोषण, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक

सणसवाडी, पुणे : येथील ट्रॅंन्टर इंडिया कंपनी व्यवस्थापनाने अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता 15 वर्ष परमनंट काम करणाऱ्या 10 कामगारांना कमी करून त्यांच्या जागेवर 30 कॅज्युअल भरून काम चालू केले त्यांनतर कामगार संघटनेच्या वतीने शांततेच्या व सनदशीर मार्गाने लेबर ऑफिस व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकवेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनी व्यवस्थापनाने वेळोवेळी विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार आणि त्यांचे सहकुटुंब यांनी न्याय मिळावा म्हणून दि. 28 फेब्रुवारी 2022 पासून आमरण उपोषण चालू केले या उपोषणास विविध कामगार संघटना, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला आहे.

    या दरम्यान आमदार अशोक पवार यांनी कामगारांच्या उपोषणाची दखल घेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून याबाबत निवेदन दिले. तसेच जिल्हाधिकारी पुणे यांना सदर विषयात लक्ष घालून कमी केलेल्या 10 कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कंपनीला सूचना द्यावा यासाठी पत्र दिले. त्या अनुषंगाने कंपनी व्यवस्थापक आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.