कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (Central Board of Trustees) पीएफ खात्यावरील व्याज कमी केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे.
सन 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये EPFO ने PF ठेवींवर 8.5% व्याज दिले होते. यापूर्वी ते 2018-19 मध्ये 8.65%, 2017-18 मध्ये 8.55%, 2016-17 मध्ये 8.65% आणि 2015-16 मध्ये 8.8% होते. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत पीएफचे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर कमी केल्यामुळे कामगार, कर्मचारी वर्गाला याचा मोठा फटका बसणार आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील आयकॉनिक सप्ताहादरम्यान काल (दि. 12 मार्च) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांच्या केंद्रीय मंडळाची 23 वी बैठक झाली. या बैठकीला उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली तर सहअध्यक्ष म्हणून श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुनील बर्थवाल तसेच केंद्रीय पीएफ मंडळाच्या आयुक्त नीलम शम्मी राव उपस्थित होते.