उपमुख्य कामगार आयुक्त कार्यालय (मध्य), मुंबईतर्फे कामगारांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : उपमुख्य कामगार आयुक्त कार्यालय (मध्य), मुंबई यांच्यातर्फे काल (दि. 12 मार्च) कामगार आणि नियोक्ते यांच्यात जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. कामगार आणि मालक यांच्यामध्ये कामगार कायद्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबईतील माहुल रोड इथल्या वीर जिजामाता नगर, येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनजागृती कार्यक्रमात आजूबाजूच्या भागातील महिलांसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   आपल्या स्वागतपर भाषणात तेज बहादूर, उपमुख्य कामगार आयुक्त (मध्य), मुंबई, यांनी कामगार आणि नियोक्ते यांच्या प्राथमिक हक्कांची आणि कर्तव्यांची माहिती दिली आणि त्यांना स्वतःच्या हितासाठी कायद्याचे पालन करण्याची जाणीव करून दिली.

    एचपीसीएलचे कार्यकारी संचालक विजय एस आगाशे यांनीही अशा प्रकारे कायद्यांचे  पालन राष्ट्रीय विकासात कसा हातभार लावू शकतो याविषयी  प्रबोधन केले. कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत प्रभावीपणे माहिती देण्यासाठी,एचपीसीएल कर्मचाऱ्यांचे  पथक ,मुंबईतील उप-कामगार आयुक्तालय मध्यवर्ती येथील अधिकाऱ्यांनी  कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांचे हक्क आणि कामगार मंत्रालयाची भूमिका याविषयी एक मनोरंजक नाटिका  सादर केली.

   ई-श्रम पोर्टलवर कामगारांच्या नोंदणीसाठी हेल्प-डेस्कचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांना संबंधित माहिती असलेली पत्रकेही देण्यात आली.

   सुनीता शुक्ला, कार्यकारी संचालक, मनुष्यबळ विकास, आरसीएफ लिमिटेड,  ए के अग्रवाल, माजी उपमुख्य कामगार आयुक्त, अहमदाबाद, व्हीएम सावंत, माजी कामगार कल्याण आयुक्त, नागपूर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या आयकॉनिक वीकच्या समारंभाचा एक भाग आहे. याअंतर्गत, केआरसीएल, एनपीसीआयएल, एमएमआरसीएल आणि ओएनजीसी  येथेही आठवड्याभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.