महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनने कांदिवली येथील महिद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव सेक्टर एक मधील 1700 कामगारांना प्रत्येकी सरासरी 14,750 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. नुकतेच युनियन आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पगारवाढीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कामगारांनी ढोल-ताशे वाजवून या निर्णयाचे स्वागत केले असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर हे गेल्या 25 वर्षांपासून महिद्रा अँड महिंद्रा कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत हा सातवा पगारवाढीचा करार आहे. नुकतेच या पगारवाढीच्या करारावर कांदिवली येथील कारखान्यात युनियनच्यावतीने सरचिटणीस सचिन अहिर, अध्यक्ष विश्वनाथ गुजर यांनी आणि कंपनीच्यावतीने उत्पादन प्रक्रियेचे प्रमुख गणेश शेणॉय, उपाध्यक्ष विजय नायर (कार्मिक) आणि कांदिवली प्लांटचे प्रमुख टॉम थॉमस यांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रथम युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने या कराराला एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर कंपनीत उभारलेल्या भव्य शामियान्यात मोठय़ा संख्येने उपस्थित कामगारांच्या साक्षीने या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.