खोपोली : येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
खोपोली नगरपरिषद हद्दीत मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर अल्टा लॅबोरेटरी लिमिटेड नावाची कंपनी आहे. काल (दि.६ मार्च) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीतील मॅन्थोल विभागात आग लागली. त्यानंतर काही वेळातच ही आग उत्पादन प्रक्रिया क्षेत्रात पसरली. या आगीच्या धुराचे लोट चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत दिसून येत होते. कारखान्याला खेटून लोकवस्ती असल्याने नागरिक घाबरले होते.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिस, खालापूर महसूल विभागाने खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन दल व परिसरातील विविध कंपन्यांतील अग्निशमन बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास सात अग्निशमन बंबांनी फोम बेस पाण्याचा मारा करून ही आग दोन तासांनी आटोक्यात आणण्यात यश मिळवले. यासंदर्भात पुढील चौकशी खोपोली पोलिस व रायगड जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
आगीचे नक्की कारण समजले नसून रिॲक्टरमध्ये स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत आठ रिअॅक्टर जळाले असून कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन कामगार भाजले असून दोघांना तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले. कामगारांनी रसायनाने भरलेले ड्रम हटवल्याने मोठी दुर्घटना टळली.