ट्रॅन्टर इंडिया व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार व कुटुंबियांचे आमरण उपोषण

सणसवाडी :  ट्रॅन्टर इंडिया व्यवस्थापनाने १० कायम कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे संबंधित कामगार व त्यांचे कुटुंबीय आज पासून (दि.२८ फेब्रुवारी) आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती ट्रॅन्टर इंडिया कामगार संघटना यांच्या वतीने देण्यात आली.

    दि. १६/१०/२०२० रोजी कोणती ही पूर्वसूचना न देता कंपनीने १० कायम कामगारांना कामावरून कमी केले त्यांनतर कामगार संघटनेच्या वतीने शांततेच्या व सनदशीर मार्गाने लेबर ऑफिस व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकवेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनी व्यवस्थापनाने वेळोवेळी विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वी देखील कंपनीतील १७ कायम कामगारांना अचानक याच पद्धतीने कमी करण्यात आले, कायम कामगार यांना कमी करून त्याजागेवरती कंत्राटी कामगार भरले जातात असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

     कामगारांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर, मुलांचे शिक्षण तसेच यापुढेही सुरू होणाऱ्या उपासमारीमुळे कामगार कुटुंबीय एका रात्रीत रस्त्यावर आणण्याचे अत्यंत निंदनीय कृत्य व्यवस्थापनाने केले अशी भावना कामगारांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कामगार वर्ग व कामगार कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून याची त्वरित दखल कंपनी व्यवस्थापन यांनी घेणे गरजेचे आहे.