रियटर इंडिया कंपनीतील कामगारांचा आंदोलनाचा इशारा

सातारा : शिरवळ येथील रियटर इंडिया कंपनीतील 350 पेक्षा अधिक कामगारांनी सहा महिन्यापूर्वी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन नावाने संघटना स्थापन केली आहे. सदर संघटना श्रमिक एकता महासंघाला संलग्न आहे.

      दिनांक 6/08/2021 रोजी संघटनेच्यावतीने पगार वाढ व इतर मागण्यांचे मागणी पत्र कंपनीस सादर केले आहे. व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याने सदर प्रकरण दिनांक 12/11/2021 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा येथे त्यांनी समेट कार्यवाहीत दाखल करून घेतले आहे परंतु त्यापुढे त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही वेळकाढू पणाचे धोरण राबवले जात आहे .

     तसेच सदर कंपनीत कंत्राटी कामगार कायद्यामधील तरतुदींचा भंग करून सुमारे पाचशे कंत्राटी कामगार हे नेहमी चालवणाऱ्या उत्पादन प्रक्रियेत कामाला लावले आहेत. सदर प्रकरणी कंपनीविरुद्ध कारवाई करण्यासाठी संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे परंतु त्याबाबत ही चालढकल चालली आहे.

       वरील प्रलंबित प्रकरणी शासन व्यवस्थेस त्याची जाणीव करुन देण्याकरिता दिनांक 24/02/2022 रोजी सातारा कार्यालय समोर बहुसंख्य कामगार यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.

          आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त यांना श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांच्याशी संपर्क साधून प्रलंबित प्रश्न पुढील आठवड्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने सध्या आंदोलन स्थगित केले आहे.सदर प्रकरणी अप्पर कामगार आयुक्त अभय गिते यांच्याशी श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी चर्चा करीत आहेत.