उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती 'पद्मभूषण' राहुल बजाज यांच्यावर काल (दि. १३ फेब्रुवारी) सायंकाळी 5.30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

    यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, योगगुरू रामदेवबाबा यांनी बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रकादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कृष्णकुमार गोयल, मोहन जोशी, बाबू वागसकर यांनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी राहुल बजाज यांचे चिरंजीव राजीव बजाज व संजीव बजाज, मुलगी सुनयना केजरीवाल यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित होते.

    शासकीय इतमामात बजाज यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजीव आणि संजीव बजाज यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला. बजाज यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आकुर्डीस्थित कारखान्यात जाऊन राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. खासदार श्रीनिवास पाटील हे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर 11 वाजता कंपनीतील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात पार्थिव नेण्यात आले. तिथे पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अंतिम दर्शन सुरू झाले. भरउन्हातही मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक लीला पुनावाला, प्रतापराव पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते-माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी बजाज यांचे बंधू मधुर बजाज, शेखर बजाज, शिशिर बजाज, नीरज बजाज, मुलगा राजीव बजाज, संजीव बजाज, सून दीपा बजाज, शेफाली बजाज, मुलगी सुनयना केजरीवाल, जावई मनीष केजरीवाल, बहीण सुमन जैन, नातू रिषभ बजाज, सिद्धांत बजाज, संजली बजाज, आर्यमन केजरीवाल, निर्वाण केजरीवाल आदी उपस्थित होते.

   आकुर्डीतील बजाज कंपनीच्या आवारातच ते राहणारे एकमेव उद्योजक होते. कामगारांशी आपुलकीने वागणारे राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली. बजाज यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

   विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष, बजाज कंपनीत 36 वर्षे काम करणारे दिलीप पवार म्हणाले, 'राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समुह भरभराटीला नेला. हजारो लोकांना नोक-या दिल्या. लाखो लोकांचा उदरनिर्वाह होत होता. डॉलरमध्ये कंपनीचे उत्पादन, नफा वाढविला. कामगारांची प्रगती केली. भक्कम, सडेतोड, नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती.कामगारांची भरभराट केली. त्यांच्या निधनाने कधीही न भरुन येणारे नुकसान झाले'. बजाज साहेब राज्यसभेचे खासदार झाल्यावर युनियम म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेलो होतो. कामगार असतानाही त्यांनी आम्हाला अर्धा तासाचा वेळ दिला. दिलखुलास गप्पा मारल्या. कंपनी स्थापनेपासूनचे सर्व अनुभव शेअर केले. 1965 पासूनचे अनुभव सांगितले. उद्योजकांमधील बजाज साहेब एकमेव कंपनीच्या आवारात राहणारे उद्योजक होते. त्यांना कामगारांच्या दुख:ची जाणीव होती. कामगारांशी ते आपुलकीने, प्रेमाने संवाद साधतात. कामराबांबत त्यांना विशेष जिव्हाळा होता' असेही पवार म्हणाले. त्यांच्या निधनाने कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत बजाज समुहाचे मोठे योगदान - बेलसरे

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, 'राहुल बजाज यांनी जवळपास पाच दशकांपासून बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज ऑटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत बजाज समुहाचे मोठे योगदान आहे. बजाज समुहामुळे लाखो कामगारांना रोजगार मिळाला. कामगारांशी आपुलकीने वागणारे उद्योजक अशी त्यांची ओळख होती. आकुर्डीतील कंपनीच्या आवारातच बजाज साहेबांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे'.

पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही - लांडगे

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे म्हणाले, 'भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. हे वृत्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी वेदनादायी आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रातील राहुलजी यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडला 'ऑटो हब'बनवण्यात बजाज समुहाचा मोलाचा वाटा आहे. बजाज यांच्या जाण्याने 'उद्योगनगरी'चे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. त्याच्या पायाभरणीमध्येच खऱ्या अर्थाने बजाज समुहाचा हातभार आहे. आज शहरातील हजारो कामगारांना रोजगार मिळाले आणि शहराला कामगारनगरी अशी ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही. राहुलजी बजाज यांच्या जाण्याने न भरुन येणारी हानी झाली आहे'.