मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या संघटनेच्या वतीने कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या संदर्भात कर्मचारी संघटना व मंडळातील अर्धवेळ कर्मचारी प्रतिनिधी यांनी मुंबई येथे मंडळाचे मुख्यालयात कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांचे मागण्या बाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी कामगार कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निवेदन स्वीकारले व अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या रास्त असलेल्या मागण्या लवकरात लवकर सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सदर संघटनेला व शिष्टमंडळ प्रतिनिधींना दिले व तसेच त्वरित कार्यवाही सुरु करण्याचे आदेश मा.कल्याण आयुक्त यांनी प्रशासन अधिकारी यांना दिले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी योजना राबविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावीत आहेत परंतु आजवर राज्य शासनाने व मंडळ प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या अनुषंगाने देण्यात आलेल्या निवेदनात सन २०१७ पासून पूर्णवेळ पदोन्नती दिली नाही ती सुरळीत करण्यात यावी, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना किमान वेतन योजना लागू करावी, या कर्मचाऱ्यांची विभागवार नव्याने ज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी, त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पूर्णवेळ कर्मचारी पदावर बढती देण्यात यावी, अर्धवेळ कर्मचारी म्हणून त्यांना बजावलेल्या सेवेचा अर्धकालावधी या कर्मचाऱ्यांना बढती दिल्यांनतर सेवेत सलंग्न करण्यात यावा, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना अनुकंपा योजना लागू करण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे . मागण्यांचे आश्वासन मान्य होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल. प्रसंगी, तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा मानद सदस्य दिलीप दादा जगताप यांनी दिला आहे.
कामगार मंडळाच्या कल्याण आयुक्तांना निवेदन देते वेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यकारी अध्यक्ष अनंत जगताप, सरचिटणीस सुधर्मा खोडे, गजेंद्र आहिर , सुनिल चव्हाण, सायली नाईक, सचिन खरोडे व अर्धवेळ कर्मचारी प्रतिनिधी प्रल्हाद बांडे, गजानन आरु, विद्या शिंदे, भारत विभूते, सुजाता जाधव, श्वेताल सुतार, नवनीत राजूरकर, उर्मिला सातपुते, भारती बोबडे, रेखा कांबळे तसेच संघटनेचे पदाधिकारी व सर्व विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.
