नवी दिल्ली : तुम्ही 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ काम केल्यास कंपनीला ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. इतकेच नाही, तर लेबर कोडच्या नियमांनुसार कंपनीला कर्मचाऱ्यांकडून सलग 5 तासांहून अधिक काळ काम करून घेता येणार नाही. कर्मचाऱ्यांना काही वेळ ब्रेक (Break) द्यावाच लागेल.
केंद्र सरकार एक ऑक्टोबरपासून लेबर कोडनुसार (Labour Code) म्हणजेच कामगार संहितेनुसार नियम (Rules) लागू करण्याच्या विचारात आहे. देशात हे नियम लागू झाले, तर ऑफिसमध्ये काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो.
कामादरम्यान द्यावा लागेल ब्रेक लेबर कोड किंवा कामगार संहितेनुसार नियम लागू झाल्यानंतर कोणतीही कंपनी सलग 5 तासांहून अधिक काळ आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊ शकणार नाही. कंपनीला कर्मचाऱ्यांना काही वेळेसाठी ब्रेक द्यावाच लागणार आहे. मसुद्यातील (Draft) नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याकडून 5 तासांपेक्षा अधिक काळ सातत्याने काम करून घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रत्येक 5 तासानंतर अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
ओव्हरटाइमचे नियम बदलणार ओएचएस कोडच्या मसुद्यातील नियमांमध्ये, 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान केलेलं अतिरिक्त कामकाज 30 मिनिटं गृहीत धरून त्याचा समावेश ओव्हरटाइममध्ये करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
