उरवडे कंपनी आग प्रकरण, भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कार्यवाही करा

कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी निदर्शने

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथे एसव्हीएस कंपनीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून १७ कामगारांचा मृत्यू झाला होता. कंपनीमधील आग ही सर्व कामगार कायद्याचे आणि कारखाना सुरक्षा अधिनियमांचे वर्षानुवर्षे मालक व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक उल्लंघन झाले त्यामुळे ही घटना घडली, यामध्ये संबंधित सरकारी विभागांचे अधिकारी आणि मालक यांच्याशी असलेले संगनमत यामुळेच अशा घटना घडत असून भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कार्यवाही करा अशी मागणी करण्यासाठी दि.४ ऑगस्ट रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहे.

कामगार संघटना संयुक्त कृती समिती वतीने सांगण्यात आले कि, उरवडे येथे एसव्हीएस कंपनीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून १७ कामगारांचा मृत्यू झाला या कंपनीला मागची तारीख टाकून कोणी परवाना का आणि कसा दिला ? तेथील कामगारांची ५ ते ७ वर्षांची सेवा कमी का दाखविली गेली ? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

औद्योगिक सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी, कामगार खाते, ईएसआय या सर्व यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरल्या गेल्या आहेत. या सर्व यंत्रणांमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची लाचलुचपत खात्याकडून चौकशी करावी, त्यांचे निवृत्ती वेतन आणि बढत्या रोखाव्यात, त्यांना निलंबित करावे या मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात येणार असलेबाबत समिती च्या वतीने सांगण्यात आले.