पुणे : औद्योगिक क्षेत्र व इतर आस्थापनामधील कामगारांमध्ये मतदारांची पध्दतशीर शिक्षण व सहभाग (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यासाठी मतदार जागृती मंचची स्थापना करण्यात यावी, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली असे वृत्त माय मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात औद्योगिक आस्थापनामध्ये मतदार जागृती मंचची स्थापना व स्वीप कार्यक्रमाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीपचे राज्य सल्लागार दिलीप शिंदे, सहसंचालक उद्योगचे सदाशिव सुरवसे, महाव्यवस्थापक डिआयसी पी. डी. रेंदाळकर, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, जिल्हयातील निवडणूक उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, शहरी व औद्योगिक क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची नोंदणी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात येऊन त्याव्दारे संघटीत व असंघटीत कामगारांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. या मंचामार्फत जास्तीत जास्त औद्योगिक आस्थापनावरील कामगारांची मतदार नोंदणी करण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया विषयी जागृती निर्माण करण्यात यावी. यासाठी स्वयंसेवी संस्था व कामगार संघटना यांचा सहभाग घेण्यात यावा.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पुणे जिल्हा हा औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हा आहे. खाजगी उद्योगधंदे मोठया प्रमाणात आहेत. या उद्योग क्षेत्रातील कामगारांमध्ये स्वीपचा कार्यक्रम प्रामुख्याने राबविण्यात येत आहे. यापुढेही जिल्हयात सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये प्रशासन, कामगार संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत स्वीप कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.