सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत चालली आहे. डिझेलला पैसे नाहीत, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पैसे नाहीत... अशा एक ना अनेक अडचणींना एसटी कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दर महिन्याला वेतन मिळते की नाही, अशी चिंता कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षापासून लागून राहिली आहे. दरम्यान, जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्यात सात तारखेला मिळणारे वेतन अद्याप झाले नसल्याने सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात एकूण 3 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. यात 1 हजार 300 चालक, 1 हजार 300 वाहक व 1 हजार 300 इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर विभागात एकूण नऊ आगार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एसटीचे महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही अशी चिंता प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांना वाटत आहे. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. तेव्हापासून एसटीच्या संचित तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील काही संघटनांनी दिला आहे.
ज्याप्रमाणे शासनाने राज्यातील विविध 31 महामंडळांतील कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मग एसटी महामंडळाचा समावेश का केला जात नाही, असा सवाल उपस्थित होत असताना, एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले जात आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. एसटीच्या प्रवासावर लोकांचा मोठा विश्वास आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.