'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ' संघटनेला मिळाले यश
ठाणे : नवी मुंबईस्थित महापे येथील 'हिवा इंडिया' या कंपनी मध्ये अनेक वर्षांपासून 'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'ची युनियन आहे. दरम्यानच्या काळात स्टाफमधील सहा कर्मचाऱ्यांनी महासंघाचे सदस्यत्व स्वीकारल्याने, कंपनी व्यवस्थापनाने त्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले. निव्वळ युनियनचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे, आकसापोटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात 'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ' अध्यक्ष श्री.राजन राजे यांनी आक्रमक भूमिका घेत, मा.कामगार न्यायालय, ठाणे येथे दावा (यूएलपी क्र. १३९/२०१४) दाखल केला.
दरम्यान, अखेर आठ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 'हिवा इंडिया'च्या कर्मचाऱ्यांना न्याय्य मिळाला असून, नोकरीतून काढून टाकलेल्या वर्षांतील पगार, झालेली पगारवाढ आणि थकीत दिवाळी बोनससह संपूर्ण रक्कम त्वरित अदा करण्याचे आदेश मा. कामगार न्यायालय, ठाणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. याकामी 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर यांनी सातत्याने प्रदीर्घ पाठपुरावा केला.
याप्रकरणी निर्णय देताना, मा. कामगार न्यायालय, ठाणे यांनी व्यवस्थापनाने तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलेल्या सहाही कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश देतानाच, त्यांची संपूर्ण थकबाकी तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. यामध्ये संदीप पालकर यांना २५ लाख ५६ हजार ६१३ रु., महेश म्हात्रे यांना २४ लाख ८९ हजार ३२७ रु., अरविंद गायकवाड यांना २२ लाख ११ हजार १७० रु., रविकिरण कोळंबकर यांना १९ लाख ४० हजार ६७१ रु., भीमराव कोटमोंड यांना १५ लाख ४३ हजार ७९२ रु. आणि अंकुश घोरपडे यांना १२ लाख ३८ हजार ३१३ रुपयांची रक्कम मिळाली.
मा. कामगार न्यायालय, ठाणे यांनी हा स्वागतार्ह निर्णय दिलेला असला, तरी यामागे 'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे अध्यक्ष श्री.राजन राजे यांनी 'हिवा इंडिया' व्यवस्थापनाविरोधात उभारलेला कायदेशीर लढा आणि महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत असल्याचे या सहाही कर्मचाऱ्यांनी सांगितले.