हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर मागील चार दिवसांपासून १३ कामगारांचे ११ महिन्यांच्या थकीत देयकाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर बनली आहे. या संदर्भातील अहवाल शनिवारी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाने दिला आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
टोकाई सहकारी साखर कारखान्यावर सुमारे चारशे कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी १५० तर हंगामी रोजंदारीवरील २५० कामगार असून या कामगाराचे अकरा महिन्यांचे पगार बिल सुमारे २ कोटी ९७ लाख रुपये थकले आहेत.
थकीत पगार बिल मिळावे अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा कामगारांनी ६ ऑगस्ट रोजीच्या लेखी निवेदनाद्वारे दिला होता. उपोषणार्थी १३ पैकी ७ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचा अहवाल शनिवारी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने लेखी दिला आहे. भुजंग खंदारे, मानेजी मोरतारे, तातेराव तरटे, शंकर अंभोरे, दुर्गादास अंभोरे, विजय मगर व संतोष पिठोरे या कामगारांचा प्रकृती गंभीर बनलेल्यांमध्ये समावेश आहे. तर इतर उपोषणार्थीमध्ये ई. बी. बर्वे, एम. सी. हजारे, व्ही. व्ही. कदम, आर. जी. गवारे, एस. पी. राठोड, डी. के. कदम यांचा समावेश आहे.
दरम्यान, कामगाराच्या उपोषण स्थळाला वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू भैया नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेटी दिल्या.