उद्योजक व कामगार संघटनात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष

औरंगाबात येथील रांजणगाव ग्रामपंचायतीचा पुढाकार; औद्योगिक क्षेत्रात शांततेसाठी प्रयत्न

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित रहावी, यासाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी रांजणगावात पत्रकार परिषद आयोजित करून उद्योजक व कामगार संघटनात समन्वय ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.

     औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून उद्योजक, कंपनीचे अधिकारी तसेच व्यावसायिक यांच्यावर हल्ले होत असल्याने औरंगाबाद शहराची प्रतिमा मलिन होत आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच उद्योग टिकून राहावेत यासाठी रांजणगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व क्रांती माथाडी व जनरल कामगार संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे घेण्यात आली.

      औद्योगिक क्षेत्रात शांतता राहावी तसेच कामगारांच्या तक्रारीची वेळीच कामगार आयुक्त कार्यालयाने दखल घेतल्यास भविष्यात अप्रिय घटना घडणार नाही. उद्योजक व कामगार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन कामगारावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 

      ग्रामपंचायतीने स्थापन केलेल्या कक्षामार्फत कामगारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उद्योजक व कामगार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय साधून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत नागराज गायकवाड, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, प्रवीण नितनवरे, दीपक सदावर्ते यांनी मत मांडले. यावेळी उपसरपंच शिवराम ठोंबरे, माजी सरपंच अशोक जाधव, मोहनीराज धनवटे, बाबुराव हिवाळे, साईनाथ जाधव, बबन पठाडे, सय्यद जावेद, काकासाहेब गायकवाड, सारंगधर जाधव, अनिल जाधव, अमोल भालेराव आदींची उपस्थिती होती.