कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी अट शिथिल

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य योजनेतील कामगार पाल्यांच्या उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली आहे, याचा फायदा इमारत बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना होणार आहे.

कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरता केंद्र शासन व राज्य शासनामार्फत शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती व ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्यामुळे सदर कालावधीत शाळा / महाविद्यालय बंद असल्यामुळे शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक उपलब्ध होणे शक्य नाही. याबाबत मंडळाच्या ५७ व्या बैठक दि.२ मार्च २०२१ नुसार ठराव करण्यात आला व त्याप्रमाणे शैक्षणिक योजना लाभ करिता कामगारांच्या पाल्यांना शालेय उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली. 

     यानुसार दि.१ एप्रिल २०२० ते दि.३१ मार्च २०२१ कालावधीतील मंडळाच्या शैक्षणिक सहाय्यकरिताचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाल्यास या शैक्षणिक योजनांमध्ये उपस्थितीची अट शिथिल करून इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे संबंधितांना लाभ देण्यात येणार आहे.

याबाबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या तर्फे दि.३० मार्च २०२१ पत्रानुसार राज्यातील अपर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त तसेच सरकारी कामगार अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.