कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Canpack India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

कॅनपॅक कंपनी कामगारांना २० हजार  भरगोस पगार वाढीचा करार यशस्वी ; १८ महिन्यांची थकबाकी मिळणार - विविध अतिरिक्त लाभांचाही समावेश

बजाजनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्लास व ॲल्युमिनियम कॅन विभागातील कामगारांच्या सुमारे १८ महिन्यांच्या प्रदीर्घ काळा नंतर अखेर यश आले आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही विभागांसाठी साडेतीन वर्षांचा वीस हजार रुपये पगार वाढीच्या करार यशस्वी  झाला. या करारामुळे दोन्ही युनिटमधील सुमारे २८० कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.

    कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्लास विभाग आणि द सीपीजी एम्प्लॉइज युनियन (सीआयटीयू) यांच्यात झालेल्या करारानुसार कामगारांना  एकूण २० हजार रुपयांची आर्थिक वाढ मिळणार आहे. पहिल्या वर्षी ही वाढ १२ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी  ४ हजार ८०० रुपये आणि तिसऱ्या  वर्षे ३२०० रुपये असा एकूण २० हजार रुपयांची वाढ मिळणार आहे. याशिवाय कामगारांना १ एप्रिल २०२५ पासून १८ महिन्यांची संपूर्ण थकबाकी (एरियर्स) देण्यात येणार आहे. करारामध्ये प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे मेडिक्लेम कव्हरेज, टर्म इन्शुरन्स, मोफत वाहतूक सुविधा तसेच सवलतीच्या दरात कॅन्टीन सुविधा यांसह विविध लाभांचा समावेश करण्यात आला आहे.

कॅनपॅकच्या ॲल्युमिनियम कॅन विभागातही मुंबई श्रमिक संघ (सीआयटीयू) आणि व्यवस्थापनामध्ये दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. दोन्ही विभागांमध्ये गेल्या दीड वर्षापासून वेतन करारासाठी विविध टप्प्यांवर चर्चा व वाटाघाटी सुरू होत्या. 

याशिवाय युनियनचे सदस्य बनलेल्या ३१ कर्मचाऱ्यांच्या ‘कामगार’ (वर्कमन) दर्जाचा प्रश्न पुढील चर्चेतून सोडविण्याचे प्रयत्न केले जाणार असून, चर्चेत तोडगा न निघाल्यास कायदेशीर प्रक्रियेद्वारे हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. 

या करारावर कॅनपॅक व्यवस्थापनाच्या वतीने सीईओ विक्रम पोतदार तसेच वरिष्ठ व्यवस्थापक जनार्दन काळे, मनोज पल्लोड, नारायण रामचंद्र आणि सुभाष शिंदे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ग्लास विभागातील कामगारांच्या वतीने द सीपीजी एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड शिवनाथ काळे, सरचिटणीस कॉम्रेड वाल्मिक होले, डॉ. विवेक मोंटेरो, कॉम्रेड हेमकांत सामंत, कॉम्रेड राजेंद्र देवकर, महादेव सुर्वे, योगेश भागवत, युवराज बनसोडे, संतोष इंगळे, प्रवीण शिरसाठ, अजित गवळी आणि सौरभ सिंग यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

तसेच ॲल्युमिनियम कॅन युनिटच्या वतीने मुंबई श्रमिक संघाचे सरचिटणीस कॉम्रेड हेमकांत सामंत, अध्यक्ष डॉ. विवेक मोंटेरो, राजेंद्र देवकर  (सचिव), कॅन युनिटचे अध्यक्ष देविदास मिसाळ, सरचिटणीस रमेश सोनटक्के यांच्यासह अजय खोकड, विजय शेळके, सचिन जैन, सतीश म्हात्रे आणि किरण खांडेभराड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कराराच्या यशस्वी ते नंतर कंपनीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर कामगारांच्या सभा घेण्यात आल्या. यावेळी कामगारांनी पेढे वाटून, घोषणाबाजी करत एकमेकांचे अभिनंदन करत  आनंद साजरा केला. या कराराच्या काळात वरिष्ठ वकील रवींद्र नायर आणि ॲड. यतीन ठोले यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.