वितरक करताहेत फसवणूक : कायमस्वरूपी सेवा नसल्याने भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती लाभकिंवा आरोग्य संरक्षणाचा नाही लाभ; सामाजिक सुरक्षा-आर्थिक संरक्षणापासूनही राहतात वंचित
पिंपरी : विविध वस्तू विक्री (एफएमसीजी) क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजही कायमस्वरूपी नोकरी, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक संरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश कर्मचारी हे कंत्राटी किंवा वितरकांच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा असंघटित कामगारांमध्ये समावेश करून स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी पुढे येत आहे.
पिंपरी चिंचवडसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर विक्री क्षेत्रातील कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. कंपनीने दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण होत असेपर्यंतच त्यांची नोकरी टिकून राहते. मात्र, बाजारातील तीव्र स्पर्धेमुळे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, तर अनेकांना नोकरी गमवावी लागते. परिणामी, सतत नवीन रोजगाराच्या शोधात फिरण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येत आहे असे वृत्त लोकमत न्यूज नेटवर्क वृत्तसंस्थेने दिले ते.
मुख्यतः दैनंदिन वापराच्या वस्तू विक्री क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठ्या तणावाखाली काम करावे लागते. विक्रेता, विक्री प्रतिनिधी, विक्री अधिकारी, विभागीय विक्री प्रतिनिधी आणि विभागीय विक्री व्यवस्थापक, अशा पदांवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प असल्याचे सांगितले जाते. कायमस्वरूपी सेवा नसल्याने भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती लाभ किंवा आरोग्य संरक्षण यांचा लाभ त्यांना मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना दररोज दुचाकीवरून मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागत असल्याने रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
स्वतंत्र महामंडळ स्थापण्याची मागणी
अपघात झाल्यानंतर संबंधितांना पुरेशी आर्थिक मदत किंवा विमा संरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विक्री क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे.
एफएमसीजी क्षेत्राचा खरा कणा हे विक्री कर्मचारीच आहेत. त्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या पगार, प्रोत्साहन, आरोग्य सुविधा आणि कामाच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि स्थैर्य टिकले, तरच उद्योगाची प्रगती टिकाऊ होईल. - लक्ष्मीकांत सोनार, विक्री कर्मचारी.
एफएमसीजी क्षेत्रातील विक्री कर्मचारी देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. ग्रामीण ते शहरी भागात आवश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम ते करतात. मात्र, या कर्मचाऱ्यांना आजही असंघटित कामगारांप्रमाणे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ गरजेचे आहे. - दीपक अडकमोल, प्रदेश सचिव, विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन.
एफएमसीजी विक्री कर्मचाऱ्यांचे जीवन बाहेरून फिरतीची नोकरी, टार्गेट आणि इन्सेंटिव्ह इतकंच दिसते. पण वास्तव खूप कठीण असते. अनेक सेल्समन दररोज मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ताणाखाली काम करतात. त्यामुळे त्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा आवश्यक आहे. - गुलफराज काझी, विक्री कर्मचारी.
