लोकप्रतिनिधींकडे आग्रही मागणी
कोल्हापूर :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून कोल्हापूर शहरांमध्ये सध्या पाच केंद्रांच्या माध्यमातून या मंडळाचे कार्य चालते. सध्या सांगली व सातारा या शहरांमध्ये फक्त एकाच केंद्राच्या माध्यमातून कार्य चालत आहे . त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरामधील काही केंद्रे उर्वरित तालुक्यात स्थलांतरित करून तेथील कामगारांचे हित जोपासावे, अशा आशयाचे लेखी निवेदन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्यावतीने लोकप्रतिनिधींना देण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून, या संस्थेच्या वतीने एस.टी. महामंडळ, सर्व सहकारी बँका, एम.एस.ई.बी., एल.आय.सी, जीवन प्राधिकरण, धर्मादाय ट्रस्ट, सर्व मोठी हॉस्पिटल्स, साखर कारखाने, वाहतूक संस्था, अशाप्रकारे अधिनियम 1948 अंतर्गत येणारे सर्व कारखाने तसेच BOMBEY SHOP AND ESTABLISHMENT ACT 1948 अंतर्गत येणारी सर्व दुकाने व आस्थापना, मोटर वाहतूक कायद्यांतर्गत येणारे कामगार अशा प्रकारे, ज्या संस्थेमध्ये पाच पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, अशा संस्थेतील कामगार, मालक व शासन यांच्या त्रिपक्षीय अंशदान निधीच्या माध्यमातून मंडळाकडे निधी जमा होत असतो.
या मंडळाच्या माध्यमातून विविध जयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर शैक्षणिक शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती, विदेशी भाषा संभाषण व लेखन प्रशिक्षण वर्ग, पाठ्यपुस्तक सहायता योजना, एमएससीआयटी अनुदान योजना, दिव्यांग शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती, असाध्य रोग उपचार सहायता योजना, अपघातात विकलांग कामगारास आर्थिक मदत, मोटर वाहन प्रशिक्षण योजना, आत्महत्याग्रस्त कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, साहित्य प्रकाशन अनुदान योजना, महिला शिवण वर्ग प्रशिक्षण योजना, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, कामगार नाट्य प्रशिक्षण, मैदानी व बैठे खेळ स्पर्धा, कामगार सहली, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालय, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व कामगार भुषण पुरस्कार अशा अनेक कामगारभिमुख योजना व उपक्रम राबवून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची आठ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी कोल्हापूर शहरांमध्ये पाच कार्यालये कार्यरत आहेत. यामध्ये एक ललित कला भवन व चार कामगार कल्याण केंद्रे यांच्या माध्यमातून या मंडळाचे कामकाज चालते. याचा लाभ फक्त कोल्हापूर शहर व आसपासच्या कामगारांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
पूर्वीच्या तुलनेत आजघडीला आजरा, भुदरगड, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, शाहुवाडी आदी. तालुक्यामध्ये अनेक व्यवसाय, कारखाने व उद्योगधंदे यांची निर्मिती झालेली आहे. मात्र आजअखेर भौगोलिक दृष्ट्या सातत्याने दुर्लक्षित असलेल्या या तालुक्यातील कामगार वर्गाला शहरात जावून मंडळाच्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा लाभ घेणे सोयीचे व परवडणारे नाही. या कारणास्तव महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांपासून निरंतरपणे वंचित व उपेक्षित राहावे लागत आहे, ही बाब संबंधित तालुक्यातील कामगार वर्ग व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अन्यायकारक आहे.
सध्या कोल्हापूर शहरामधील भाड्याच्या जागेत कार्यरत असणारी कांही केंद्रे इतर तालुक्यात स्थलांतरित केल्यास, संबंधित तालुक्यातील कामगारांना मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात सामील होणे शक्य होईल तसेच सर्वच केंद्रांचे लाभार्थी वाढतील. जेणेकरून मंडळ स्थापनेचा मुळ हेतू साध्य होईल. त्याचबरोबर मंडळाला कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
महत्वाची बाब म्हणजे सध्या सांगली व सातारा शहरात फक्त एकाच केंद्राच्या माध्यमातून कामगारभिमुख कार्य चालते. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरामधील कांही केंद्रे स्थलांतरीत करून उर्वरीत तालुक्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी, शासन पातळीवर उचित कार्यवाही करावी, अशा आषयाचे लेखी निवेदन मा.ना.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य मंत्री, मा.ना.हसन मुश्रीफ - वैद्यकिय शिक्षण मंत्री, आमदार सतेज पाटील - विधान परिषदेचे गटनेते यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने दिले असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यावेळी संजय सासने, अनिता काळे, भगवान माने, संभाजी थोरात, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, शिवाजी चौगुले, मुनीर मुल्ला, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
ब्लॉग - 1
मंडळाची केंद्रे असलेले तालुके करवीर, कागल, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ.
ब्लॉग - 2
मंडळाची केंद्रे नसलेले तालुके राधानगरी, आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, शाहूवाडी
ब्लॉग - 3
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजना, उपक्रम, नोंदणी, लाभ व सेवांसाठी शहरात जावे लागते. यामुळे वेळ, पैसा व श्रमांचा अपव्यय होतो. म्हणूनच, शहरातील केंद्रांचे विकेंद्रीकरण करणे ही काळची गरज आहे.
विकेंद्रीकरणाचे फायदे -
वेळेची बचत, आर्थिक बचत, सुलभ व सोयीस्कर सेवा त्वरीत मिळते.
