पुणे : मुंबईतील केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरणात तत्काळ कायमस्वरूपी न्यायाधीशांची नियुक्ती करावी किंवा सर्व प्रलंबित खटले प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग करावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केली आहे. याबाबत डॉ. कुचिक यांनी केंद्रीय कामगारमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
डॉ. कुचिक म्हणाले, सध्या या न्यायाधिकरणांमध्ये पूर्णवेळ न्यायाधीश नसल्याने अनेक खटले प्रलंबित आहेत. २००७ साली कामावरून बेकायदेशीर काढलेल्या कामगारांना २०२६ उजाडले तरी न्याय्य मिळत नसेल तर न्यायालयाचा काय उपयोग आहे? गुजरात उच्च न्यायालयाने अहमदाबाद दावे राज्याच्या न्यायाधीकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर आमच्या मागणीवर निर्णय अपेक्षित असताना कामगार मंत्रालयाने संबंधित विभागाकडे प्रकरण पाठवल्याचे सांगितले. असे असेल तर गुजरातला वेगळा न्याय का? असा सवाल डॉ. कुचिक यांनी केला आहे.
