उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत सोमवारी बैठकीचे आयोजन

कोल्हापूर : इचलकरंजीतील मजुरी तत्त्वावर काम करणाऱ्या (खर्चीवाल्या) यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी बैठक आयोजित करतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रमागधारकांना सांगितले.

    यानुसार, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार इचलकरंजी प्रांताधिकारी उद्या (सोमवारी) कोल्हापूर जिल्हा पॉवरलुम असोसिएशनचे पदाधिकारी व आंदोलनकर्ते पदाधिकारी व कापड विक्रेते (ट्रेडिंग धारक) यांची बैठक आयोजित केली आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

    इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे संस्थापक पुंडलिक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केली. यानुसार शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा अशा सूचना केल्या.

    सन २०१३ पासून खर्चेवाल्या यंत्रमागधारकांना ट्रेडिंग असोसिएशन कडून अजिबात मुजरीवाढ मिळाली नाही. पर्यायाने विजेचे वाढते दर, यंत्रमालागाला लागणारा खर्च व इतर अनुषंगिक प्रचंड खर्च वाढल्याने हा उद्योग बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून इचलकरंजी व परिसरातील यंत्रमाग बंद असल्याने शहराची औद्योगिक शांतता धोक्यात आल्याचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

    यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उपस्थित होते. तर यंत्रमागधारकांच्यावतीने पुंडलिक जाधव, विश्वनाथ मेटे, विनय महाजन, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे यांचा सहभाग होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उयंत्रमागधारकांच्या प्रतिनिधीशी बैठक बोलावली होती. एकंदरीत खर्चीवाल्यांच्या मजुरी वाढीचा प्रश्न आता मुंबई दरबारी पोहोचला आहे.

इचलकरंजी यंत्रमाग उद्योग

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर हे ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाते。हातामाग उद्योगापासून सुरू झालेला हा प्रवास आज अत्याधुनिक यंत्रमागांपर्यंतपोहोचला आहे。शहरात सुमारे १ लाख यंत्रमाग कार्यरत आहेत, ज्यांवर सुती, पॉलिस्टर आणि डेनिम कापड तयार केले जाते आणि या उद्योगावर हजारो कामगार अवलंबून आहेत.

     १९०४ मध्ये इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग सुरू झाला. १९६२ मध्ये येथे आशियातील पहिली सहकारी सूतगिरणी ‘द डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल’ स्थापन झाली. सध्या शहरात साध्या यंत्रमागांसह आधुनिक एअर-जेट आणि रॅपियर (Rapier) यंत्रमाग मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. इचलकरंजीतून दररोज कोट्यवधी मीटर कापडाचे उत्पादन होते.