पुणे :स्थानिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने इंदापूरच्या रत्नापुरी इस्टेटमधील 1000 एकर जमीनमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे इंदापूर व बारामती परिसरात औद्योगिक गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे सरकारच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रस्तावित औद्योगिक वसाहत वालचंदनगर औद्योगिक क्षेत्राजवळ असणार असून येथे एरोस्पेस, संरक्षण तसेच साखर कारखाना यंत्रसामग्री निर्मिती करणारे उद्योग कार्यरत आहेत. हे ठिकाण बारामती औद्योगिक क्षेत्रापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असून येथे ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया यांसारखे विविध उद्योग आधीच स्थिरावले आहेत.
हस्तांतरित करण्यात आलेली जमीन यापूर्वी महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या अखत्यारित होती. सुरुवातीला MIDC ने रत्नापुरीतील तीन गावांमधील 135 हेक्टर जमीन संपादनासाठी परवानगी मागितली होती. यापैकी 131 हेक्टर जमीन जुलै महिन्यात प्राप्त झाली असून उर्वरित 65 हेक्टर जमीन मिळणे बाकी आहे. त्यानंतर नियोजित औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त 600 हेक्टर जमीन मागण्यात आली.
