मुंबई : आखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ : भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने गुरुवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) सोबत कामगारांच्या हिताचा एक ऐतिहासिक वेतनवाढ करार यशस्वीपणे संपन्न केला असे वृत्त झी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
हा महत्त्वपूर्ण करार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
या वेतनवाढ कराराची अंमलबजावणी ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. या करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा रु. ७,२५० इतकी भरीव वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी रु. ५०,००० बोनस मिळणार आहे, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की,हा करार NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला तिसरा वेतनवाढ करार असून, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने आपल्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर कामगारांच्या वेतनवाढीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश आहे.
या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी समारंभास NCPA च्या वतीने अध्यक्ष श्री. संटूक, संचालक श्री. फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक श्री. काळे तसेच मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक व्हिन्सेंट डिसूझा उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सरचिटणीस श्री. सुहास माटे, उपाध्यक्ष श्री. प्रशांत वर्तक तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी प्रक्रियेत सहभागी होते.
"कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश म्हणजे एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली NCPA मधील कामगारांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यातील अधिक चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे." असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

