बुलढाणा : पारले कंपनीसाठी उत्पादन करणाऱ्या खामगाव येथील शिवांगी बेकर्सचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये कामगार अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेली बोलणी अपयशी ठरली. यामुळे कामगारांचे आंदोलन अटळ ठरले! असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
मंगळवारपासून कामगार प्रतिनिधींनी टॉवर चौकातील उपविभागीय (महसूल) कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहे. दुसरीकडे, राजकीयदृष्ट्या संवेदनशील खामगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षीय नेते, पदाधिकारी या आंदोलनाची आणि कामगारांवरील अन्यायाची आता तरी दखल घेणार काय? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चार पदाधिकाऱ्यांचा अन्नत्याग
शिवांगी बेकर्स समोर झालेल्या द्वार सभेत ही घोषणा करण्यात आली. कामगार नेते दीपक सुलताने, विजय मांडवेकर, जयसिंह बघेल, सचिन काटोले यांच्या नेतृत्वात ही सभा घेण्यात आली. या सभेला तिन्ही पाळीतील शेकडो कामगार सहभागी झाले. व्यवस्थापन कठोर भूमिका घेत असल्याने आंदोलन अटळ असल्याचे सुलताने व अन्य नेत्यांनी सांगितले. त्यामुळे वरील चार कामगार प्रतिनिधीनी आज ८ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. वेतनवाढ सह चौदा मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यापूर्वी रविवारी बुलढाणा येथील कामगार अधिकारी यांनी कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये तोडगा निघावा व आंदोलन होऊ नये याकरिता शिवांगी बेकर्स येथे बैठक घेतली. व्यवस्थापनाने रोजंदारीत एक रुपयानेही वाढ करणार नाही, उलट तीन पगारी सुट्ट्या कमी करू अशी कठोर भूमिका घेतली. कुठल्याच प्रकारचा तोडगा काढण्यास व्यवस्थापन तयार नाही असे दिसून आले त्यामुळे आंदोलन अटळ ठरले.

