नाशिक : इगतपुरी येथील महिंद्रा आणि महिंद्रा लि. इगतपुरी (Mahinda and Mahindra Ltd.) कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांच्यात साडेतीन वर्षांसाठी वेतनवाढीचा करार झाला आहे. या करारानुसार कामगारांना सरासरी दरमहा १७ हजार ५०० रुपये इतकी वेतनवाढ मिळणार असून, कंपनीतील २३० कायम कामगारांना याचा लाभ होणार आहे.
या करारामुळे काही कामगारांचे एकूण मासिक वेतन कमाल ९० हजार, तर इतर कामगारांचे ६८ हजारांपर्यंत जाणार आहे. करारात कामाच्या प्रत्येक पाळीत उत्पादनासाठी ४७० मिनिटे काम आणि आठ टक्के उत्पादनवाढ मान्य करण्यात आली.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
करार कालावधी : साडेतीन वर्ष
एकूण पगार वाढ : रु. १७,५००/- (तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने)
पहिले वर्ष : ९४ टक्के, दुसरे वर्ष ३ टक्के, तिसरे वर्ष ३ टक्के वेतनवाढीपैकी ५३ टक्के रक्कम पीएफ बेसमध्ये, तर ४७ टक्के नॉन-पीएफ भत्त्यांमध्ये
करार कालावधीतील थकबाकी ४१ टक्के प्रमाणे अदा
एन-१ ग्रेडमधील कामगारांना डी-१ ग्रेडमध्ये समावेश
उत्पादनवाढ : एकूण ८ टक्के (प्रत्यक्ष ७ टक्के जीएच पाच मिनिटे = १ टक्के)
उत्पादनासाठी कामाची वेळ ४७० मिनिटे प्रतिपाळी
बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
अर्धा दिवस रजा घेण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर सुविधा व बदल :
कॅन्टीन कपात : रु.१५०/- ऐवजी रु.२५०/- दरमहा
स्वेटर व रेनकोट भत्ता : रु.१,२००/- ऐवजी रु.२,००० (तीन वर्षांतून एकदा)
उन्हाळी टोपी भत्ता : रु.३५/- ऐवजी रु.६५/- वार्षिक
सणासाठी आगाऊ रक्कम : रुपये ५ हजार ऐवजी रुपये १० हजार
अर्जित रजा साठवणूक : १५० ऐवजी १५५ दिवस
आजारपणाची रजा : ७० ऐवजी ७५ दिवस
अडीच दिवसांच्या आजारी रजेसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक नाही
दसरा पूजेसाठी दोन तासांची सवलत पूर्ववत
महिंद्र वेल्फेअर योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा :
कंपनीत सेवेत असताना एखाद्या कायम कामगाराचे निधन झाल्यास त्याच्या मुलाला नोकरीत संधी दिली जात होती. नव्या करारानुसार आता निधन झालेल्या कामगारांच्या पत्नीलाही सेवेत सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या बदलामुळे कामगार कुटुंबांना अधिक सुरक्षितता व आधार मिळणार असल्याचे कामगार प्रतिनिधींनी सांगितले.
कंपनीतर्फे ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे सीएओ विनय खानोलकर, कार्मिक विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय क्षीरसागर, सिनियर जनरल मॅनेजर व प्लांट हेड राजेश खानोलकर आणि संदीप गिजरे तसेच कामगार सेनेतर्फे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत, संयुक्त सरचिटणीस प्रकाश नाईक, चिटणीस दिलीप जाधव, तसेच इगतपुरी युनिटचे अध्यक्ष भगवान आडोळे, सरचिटणीस अर्जुन भोसले, उपाध्यक्ष अंकुश बकाल, सहचिटणीस संदीप विश्वकर्मा, खजिनदार रमेश अहिरे, सदस्य गजानन कदम , कामगार शिक्षक व सदस्य रोहिदास चौधरी कमिटी सदस्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

