पिंपरी : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काय परिणाम होऊ शकतो ? याचा अभ्यास करणार आहोत. त्यादृष्टीने राज्यातील उद्योग जगतासाठी देशामधील पहिले 'एआय' धोरण पुढील तीन ते चार महिन्यांत निश्चित केले जाईल'', अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली.
तसेच 'एआय'वर आधारित काही अभ्यासक्रमही तयार केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, ''पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, पर्यावरण विभाग यांनी एकत्र येत दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा बनविला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला देखील लवकरच मान्यता मिळेल. नदीत रसायनयुक्त पाणी सोडले जाऊ नये म्हणून सामायिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्रासाठी भोसरी एमआयडीसीतील जागेची निवड केली होती. ती जागा एमआयडीसीसाठी सोईस्कर होती. मात्र, नागरिकांच्या दृष्टीने ती सोईस्कर नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे एसटीपी व सीईटीपी प्रकल्प राबवताना लोकांना त्याचा त्रास होणार नाही, अशी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत जागेचा प्रश्न सुटेल, असेही सामंत यांनी सांगितले.
