बिल्ट आष्टी येथील एपीआर सॅक प्लांटमधील कामगारांना न्याय मिळवून देण्यात मान्यता प्राप्त कामगार संघटनेला मोठे यश आले असून, बंद झालेल्या बल्लारपूर पेपर मिलमधील ३७९ कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटी व रजा रोखीकरणापोटी तब्बल ३ कोटी ८ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच आष्टी येथील एपीआर सॅक प्लांट पूर्ववत सुरू ठेवण्याचाही महत्त्वपूर्ण तोडगा काढण्यात आला आहे असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
बल्लारपूर पेपर मिलची सहयोगी कंपनी अंवता होल्डिंग लिमिटेडमार्फत आष्टी येथील एपीआर सॅक प्लांट इतरत्र हलविण्याची आणि आष्टी पेपर मिलची २९२.५० एकर जमीन त्रिवेणी लॉयड्स मेटल प्रा. लि. कंपनीला विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर सुमारे ४०० कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. यामध्ये ४४ स्थायी व ३४३ कंत्राटी कामगारांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी २०२६ पासून मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेत अप्पर कामगार आयुक्त नागपूर किशोर दहीफळकर यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन व कामगार संघटनेदरम्यान अनेक बैठका पार पडल्या.
६ मे २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. त्यानुसार आष्टी येथील एपीआर सॅक प्लांट पूर्वीप्रमाणे त्याच ठिकाणी सुरू राहणार असून, २९२.५ एकर जमिनीपैकी १४.०६ एकर जमीन एएचएल आष्टी युनिटला लीजवर देण्याचे ठरले. तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी ५ कोटी रुपयांची सुरक्षा ठेव (फिक्स डिपॉझिट) करण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रलंबित वेतनवाढ करार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. बिल्टसाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना नव्या उद्योगात रोजगार मिळावा यासाठी लॉयड्स मेटल्स व्यवस्थापनाकडे विनंती करण्याचेही ठरले.
दरम्यान, २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत बल्लारपूर पेपर मिलमधील ३७९ कंत्राटी कामगारांना निवृत्ती उपदान व रजा रोखीकरणाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ग्रॅज्युटीपोटी ३ कोटी ४ लाख रुपये तर रजा रोखीकरणासाठी ३ लाख ८५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित ७६ स्थायी कामगारांना बल्लारपूर पेपर मिलमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत करण्यात आले आहे.
कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मार्ग निघाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत बिल्ट व्यवस्थापनातील निहार अग्रवाल, रणजी अब्राहम, उदय कुकडे, प्रविण शंकर, सुरेशबाबू, जॉन मॅथ्यू तसेच युनियनचे बी. सी. बॅनर्जी, तारासिंग कलसी, विरेंद्र आर्य, सुभाष माथनकर आणि अप्पर कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, कामगारांच्या मागण्यांना न्याय मिळाल्याने गेल्या ७२ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली असून, आष्टी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
