FDC lndia Limited येथे वेतनवाढ करार संपन्न

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील औषधनिर्मिती करणाऱ्या एफडीसी लिमिटेड कंपनीच्या कामगारांना १८ हजार ५०० रुपयांची भरघोस वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. हा वेतनवाढीचा करार गुरुवारी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या सी. ओ.डी. करार २०२५ ते २०२९ चार वर्षांकरिता पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला. वेतनवाढ जाहीर होताच कामगारांनी आनंद व्यक्त करत कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बँन्ड पथक बोलावून वाजत गाजत, फटाक्यांची आतषबाजी केली.

    एफडीसी लिमिटेड कंपनीत ६८ कायमस्वरूपी कामगार कार्यरत असून, एफडीसी कंपनीअंतर्गत कामगार संघटना आहे. कंपनी व कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीसंदर्भात झालेल्या अंतिम बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली. या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाकडून एच. आर. विभागाचे झफरुल्लाह खान, जनरल मॅनेजर जीवन टिकेकर, व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, एच. आर. विभागाचे विवेक जोशी व रोशन भुरवणे उपस्थित होते. तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डी. के. गायकवाड, विनायक गरड, रामनाथ खेडकर, ज्ञानेश्वर खोमणे, दिलीप वाणी व नवनाथ चव्हाण सहभागी झाले होते.

विविध सेवा सुविधा मिळणार :

वेतनवाढीबरोबरच कामगारांना विविध सुविधा व लाभ मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ३६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस, निवृत्तीवेळी एक महिन्याचा ग्रॉस पगार, सर्व्हिस अवॉर्ड, क्रीडा सहाय्यासाठी ८० हजार रुपये, आपत्कालीन व्याजमुक्त कर्ज ७० हजार रुपये, २ लाखांची मेडिक्लेम पॉलिसी, २,८०० रुपये एलटीए, ८ लाखांचे जीपीए विमा संरक्षण, २० हजारांचा बेनिव्होलेंट फंड तसेच वार्षिक ६० रुपयांची इन्क्रिमेंट यांचा समावेश आहे.

    दरम्यान, ही वेतनवाढ थकबाकीसह १ नोव्हेंबरपासून १७,५०० लागू करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. तर उर्वरित १५०० रुपये प्रत्येक महिन्यात ५०० रुपये अशी पुढील सलग तीन महिने पगारवाढ केली जाणार आहे. अशी १८,५०० रुपयांची पगारवाढ होणार आहे.