धोकादायक कारखान्यांची विशेष तपासणी मोहीम- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

तारापूर एमआयडीसीतील वायू गळती प्रकरणी कारखाना बंद

नागपूर : तारापूर एमआयडीसीतील मेडली केमिकल कारखान्यात वायू गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करून तो बंद करण्यात आला आहे. मानवी चुकीमुळे व्हॉल्व्ह न उघडल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधान परिषद (दि. १४ डिसेंबर) सांगितले.

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यास कामगार मंत्री उत्तर देताना बोलत होते.

कामगार मंत्री श्री फुंडकर म्हणाले,मृत कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई व सानुग्रह अनुदान देण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत विमा योजनेंतर्गत पेन्शनसाठी दावा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या औद्योगिक अपघातांच्या पार्श्वभूमीवर तारापूर–पालघर परिसरातील धोकादायक कारखान्यांची येत्या महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी विधानपरिषदेत दिली.