नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांकडून ३० ते ३५ वर्षांपासून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे ७० टक्के काम करवून घेतले जाते. अल्प वेतनात कंत्राटी पद्धतीवर या कामगारांचे शोषण सुरू आहे. कंत्राट नियमन आणि निर्मूलन कायद्याचा हा भंग असल्यामुळे त्यांना न्याय मिळावा, यासाठी एकजुटीने संघर्षाची लढाई करण्याचा इशारा राष्ट्रीय श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी दिला.
कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे, कंत्राटी कामगारांना नवी मुंबई मनपाच्या सेवेत कायमस्वरूपी केले पाहिजे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या कामाचा फरक द्यावा अशा विविध मागण्या सोडवण्यास आपण प्राधान्य देणार असून यासाठी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी सभेत बोलताना सांगितले.
पिपंरी-चिंचवड पालिकेतील ५७२ कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे यासाठी उभारलेल्या लढ्याला यश येऊन पूर्वीच्या कामाचा फरक सुमारे ६२ कोटी रुपये मिळवून दिल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.
सभेत विविध ठराव संमत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने मागील ३२ वर्षांपासून कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या श्रमिक कामगारांना कायमस्वरूपी करावे असा ठराव संमत करण्यात आला. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर मिळावे, १९९० च्या कंत्राटी निर्मूलन कायद्याचे पालन व्हावे यासाठी आगामी काळात आम्ही मोठा लढा उभारणार असून सर्व कंत्राटी कामगारांनी लढ्यात सामील होण्याचे आवाहन यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी केले. सभेत संघटनेचे सरचिटणीस सतीश एरंडे, रामराजे भोसले, राजू अरणकल्ले, महेंद्र अनंत पाटील, डी. के. कोळी उपस्थित होते.
