नवीन कामगार संहितेच्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नागपूर : केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ( दि. ८ डिसेंबर) कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी आढावा घेतला.

    बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. एन. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, उपसचिव दीपक पोकळ आदी उपस्थित होते.

    मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, नवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज असावे. या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा. कामगार संहितेबाबत जनजागृती करण्यात यावी. राज्यात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कामगार कायदे आणि नवीन कामगार संहिता यामधील बदल लक्षात घेऊन त्यानुसार अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी.

    वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती संहिता या चार नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू करण्यात आल्या आहेत. राज्यामधील असलेल्या कामगार कायद्यांच्या तरतुदी आणि नवीन कामगार संहितांच्या तरतुदींचा विस्तृत आढावा सादरीकरणाद्वारे यावेळी घेण्यात आला.