डॉ. रघुनाथ कुचिक यांची जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत निवड

पुणे : शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) तर्फे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत (ILC 2025) सहभागासाठी अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे.

    ही परिषद २ ते १३ जून २०२५ दरम्यान पॅले दे नॅशन्स, जिनिव्हा येथे होणार असून जगभरातील १८७ सदस्य राष्ट्रांतील शासन, कामगार व नियोक्ते प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. ही परिषद कामगार विषयांवर आधारित जगातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असून, जागतिक स्तरावर कामगार धोरणे, मानके व हक्क यावर चर्चा, संवाद व विधेयक मसुद्यांची मांडणी केली जाते.

     डॉ. कुचिक दिनांक २ ते ७ जून २०२५ दरम्यान जिनिव्हा येथे उपस्थित राहणार असून, ३ जून रोजीच्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करणार आहेत. या महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावर भारताचे व भारतीय कामगार चळवळीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही शिवसेना, भारतीय कामगार सेना व संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब आहे.

डॉ. कुचिक यांनी देशातील कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला असून, त्यांच्या कार्याची ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.

“ही संधी केवळ वैयक्तिक सन्मान नाही, तर संपूर्ण संघटनेसाठी व देशातील कामगार चळवळीसाठी अभिमानाची बाब आहे. ILO व आयोजकांचे मन:पूर्वक आभार,” असे डॉ. रघुनाथ कुचिक यांनी याप्रसंगी सांगितले.