राहाता - शिर्डी संस्थानच्या 598 कामगार तसेच उर्वरित 2023 पर्यंत सर्व कामगारांना कायम करण्यात यावे, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांच्यावतीने अनिल आहेर, सुभाष वाघमारे, दीपक तुरकणे, विशाल दहिवाळ, संदीप गमे आदी उपस्थित होते असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.
शिर्डी संस्थानच्या कामगारांच्या प्रश्नाविषयी मुंबई येथे सागर बंगल्यावरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांपैकी जे पात्र असतील त्यांना तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायम करण्यात यावे.
यापूर्वीही या कामगारांना कायमस्वरुपी करण्याकरीता 1 वर्षापूर्वी विधानसभेत चर्चा झाली होती. त्यावेळी या कामगारांना कायम करण्याबाबत सरकारच्या वतीने उत्तर देताना आपण सकारात्मक भूमिका घेतली होती परंतु अद्यापपर्यंत या कामगारांना न्याय मिळालेला नाही.
आपण तात्काळ कार्यवाही करून (1052 कायम झालेले कामगार व हे 598 कामगार एकाच वेळचे असून) या कामगारांना त्यांच्या प्रमाणेच पूर्वलक्षी प्रभावाने वेतन श्रेणी लागू करून कायम करावे तसेच इतरही उर्वरित 2023 पर्यंत जे कामगार आहेत त्यांनाही संस्थान सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फडणवीस यांनी तत्काळ याबाबत प्रधान सचिव न्याय विधी यांच्याशी बोलन हा विषय लवकरच संपवणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच कामगारांच्या समवेत डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी न्याय विधीच्या सुवर्णा केवले यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. कामगारांवर झालेल्या अन्यायाची वस्तुस्थिती प्रधान सचिवांच्या लक्षात आणून दिली.
शिर्डी संस्थानच्या 598 कामगरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सरकार यामध्ये पूर्णपणे सकारात्मक आहे. या कामगारांच्या विषयाबाबत तात्काळ प्रधान सचिव न्याय विधी यांच्याशी बोलून हा विषय लवकरच संपवणार असल्याचे आश्वासन दिले.- राजेंद्र पिपाडा