भिगवण : भादलवाडी येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीच्या प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत गेली पंधरा दिवस इंदापूरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या पाच कामगारांच्या उपोषणाकडे पंधरा दिवसानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आज भिगवण येथे या उदासीनतेच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला असे वृत्त महान्यूज live वृत्तसंस्थेने दिले आहे.
24 जानेवारी 2024 रोजीपासून इंदापूरच्या तहसील कार्यालयाबाहेर पाच कामगार आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मात्र पंधरा दिवस होऊनही कायमचा निर्णय होत नाही. दरम्यान एक फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये माथाडी बोर्डाने एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये ३० दिवसांचा कालावधी मागण्यात आला. कामगारांची प्रकृती खालावली असून पंधरा दिवस उलटूनही अद्याप बिल्ट कंपनी अथवा माथाडी बोर्ड यांनी कोणीही प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांबाबत निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.. त्यामुळे शासनाने गोरगरीब कामगारांचा विचार करून त्यांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे या मागणीसाठी 8 फेबुवारी सकाळी 10 वाजता भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी भिगवण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पराग जाधव, माजी सरपंच तानाजी वायसे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बंडगर, महासंघाचे विभागीय संघटक राजकुमार मस्कर, लोकशासन आंदोलनाचे पूणे जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत भोई, शरद चितारे, छगन वाळके, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे, सुभाष फलफले, नामदेवराव जगताप, सुनिल काळे, गुररप्पा पवार, प्रशांत गायकवाड यांच्यासह कामगार उपस्थित होते.
कामगारांना लेखी नियुक्तीपत्र माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही असा आंदोलकांचा ठाम निर्धार असून कामगार गेली पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास संपूर्णतः बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी, माथाडी बोर्ड, कामगार आयुक्त कार्यालय पुणे व प्रशासन संपूर्णतः जबाबदार राहील तसेच सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस, त्यासही वरील प्रशासन जबाबदार राहील असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप यांनी प्रशासनाला दिला.