कामगारांचा संप स्थगित; निर्णयाचा चेंडू विश्वस्तांच्या कोर्टात

नेवासा : शनिशिंगणापूर येथील श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान ट्रस्ट कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन पुढील दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. नाशिक येथे सीआयटीटू कामगार युनियनचे पदाधिकारी आणि देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय झाला आहे.

    श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान ट्रस्ट कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. कामगार मंगळवारी (ता.26) संपावर जाणार होते. परंतु देवस्थान विश्वस्त आणि कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे संपावर एकत्रित जाण्याचा निर्णय दहा दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे युनियनचे जिल्हाध्यक्ष मेहबूब सय्यद आणि देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले असे वृत्त सरकारनामा वृत्तसंस्थेने दिले आहे.

    नाशिक येथे झालेल्या बैठकीवेळी सीआयटीटू कामगार युनियनचे राज्याचे नेते डॉ.डी.एल.कराड आणि पदाधिकारी उपस्थित होते. शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त अप्पासाहेब शेटे, दिपक दरंदले, पोपट शेटे, माजी अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, छबुराव भुतकर होते.

    कर्मचारी अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पद निश्चिती करावीत, सन 2003 पासून मागील फरकासह सातवा वेतन आयोग लागू करावा, वैद्यकीय सेवा मोफत द्यावी, कोरोना संसर्ग काळातील 18 महिन्यांचा राहिलेला अर्धा पगार द्यावा, या प्रमुख मागण्यांसह एकूण दहा मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. नाशिक येथे देवस्थान विश्वस्त आणि कामगारांची ही बैठक अडीच तास सुरू होती. या बैठकीत सर्व दहा मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने पुकारलेले संप दहा दिवस स्थगित करण्यात आला.

    नाताळ सणाच्या सुट्टीत शनिशिंगणापूरला लाखो भाविकांची शनीदर्शनासाठी गर्दी होते. यातच कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने देवस्थानमधील कामकाजाचे नियोजन कोलमडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील चार दिवसांपूर्वी देवस्थानच्या भक्तनिवास येथे सर्व कामगारांनी एकत्रित बैठक घेतली होती.

    या बैठकीत 25 डिसेंबरपासून संपावर जाण्याची नोटीस बजावण्यात आली होती. दुस-याच दिवशी संपाची तीव्रता अधिक व्हावी याकरीता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व कामगारांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन संपात सहभाग सर्व कामगार जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या निवासस्थानाच्या समोर महामुक्काम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर देवस्थानचे प्रशासन खडबडून जागे झाले होते.

    दरम्यान, नाशिक येथे काल बैठक सुरु झाली. देवस्थानमध्ये विविध विभागात काम करणारे कर्मचारी बैठकीत काय होते, याची माहिती घेत होते. बैठक लांबल्याने कामगारांचे बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागले होते. बैठकीत सहभागी कर्मचाऱ्यांना काही कामगार भ्रमणध्वनीवरून संपर्क करून अपडेट घेत होते. कामगारांनी मांडलेल्या मागण्यांवर तब्बल अडीच तास सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर कामगार युनियनने दहा दिवस संप स्थगित केला.

    दहा दिवस संप स्थगित केल्याची माहिती समोर आल्यानंतर कामगार, ग्रामस्थ व व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला. कामगारांच्या हक्कासाठी लढाई सुरू आहे. संप स्थगित केला आहे. मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी कामगारांनी देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाला एक संधी दिली आहे. सुट्टी असल्याने देवस्थानमध्ये भक्तांची गर्दी आहे.

   कोणाचीही गैरसोय व्हायला नको म्हणून, कामगारांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आता देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाने एक पाऊल पुढे यावे आणि कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन सीआयटीटू कामगार युनियनने केले आहे.