कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

वालचंदनगर : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान,गगनयान, मंगळयान,सुर्ययानासारख्या मोहिमेची महत्वाची उपकरणे तयार करणाऱ्या वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.२० दिवसापासुन कंपनीचे कामगार संपावरती असून कंपनीचे व्यवस्थापन दुजाभाव करीत असल्यामुळे कामगारांनी अर्धनग्न आंदोलन करुन व्यवस्थापनाचा निषेध केला असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या ६३० कामगारांनी २२ नोव्हेंबर पासुन संपास सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.११) रोजी संपाचा २० वा दिवस होता. कामगारांनी शांततेमध्ये संप करण्याचा निर्धार केला असून दररोज एक तास युनियनच्या कार्यालयासमोर एकत्र बसून चर्चा करीत आहेत. यासंदर्भात आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की, वेतनवाढीच्या कराराची मुदत ३ वर्षाची असते. व्यवस्थापन वेळेमध्ये करार पूर्ण करीत नाहीत.

    दीड ते दोन वर्ष वेतनवाढीचा कराराची बोलणी सुरु ठेवून करार जाणीवपूर्वक रखडवला जातो. यापूर्वीचे करार देखील असेच रखडवून कामगारांना मेटाकुटीस आणले होते. याउलट व्यवस्थापनाचा वेतनवाढीचा कराराला एक महिना ही विलंब न होता प्रत्येक वर्षी वेळेमध्ये होतो. जुलै २०२३ मध्ये व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा भरगच्च (भरीव) वेतनवाढ दिली. मात्र कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून १६ महिने झाले आहेत. आत्तापर्यंत २१ बैठका झाल्या असून कामगारांच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नाही. कामगारांवर व्यवस्थापन अन्याय करीत आहे. तसेच कामगारांची तीन पगार व इतर देणी थकीत असताना व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे एकाचदिवशी दोन पगार करुन कामगारांच्या जखमेवरती मीठ चोळल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगून कामगारांनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचा निषेध करुन अर्धनग्न आंदोलन केले.

    यावेळी आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की,कामगारामध्ये अफवा पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहे. अफवा पसरवून कामगारांच्यामध्ये फुट पाडण्याचे कटकारस्थान सुरु आहे. मात्र कामगार अफवेला बळी पडणार नाही. कामगारांचे एकजुट भक्कम आहे. एक कामगार कामावरती तर सर्व कामगार कामावरती, एक कामगार बाहेर तर सर्व कामगार एकाच वेळी बाहेर कामगार संघटनेचे असे सुत्र आहे.

    कामगार संघटना वेतवाढीचा करार व कामगारांच्या मागण्यावरती ठाम असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावरती न जाण्याचा निर्धार केला आहे. कामगारांच्या पाठीशी संघटना कायम उभी राहणार आहे. येणारा काळ कामगारासाठी निश्‍चित सुवर्णकाळ असून कामगारांनी सयंम बाळगण्याचे आवाहन केले.